कर्मयोगी आबासाहेब काकडे: एक शिक्षणमहर्षी व दूरदर्शी नेता

इतिहासाच्या पार्श्वभूमीवर काही व्यक्ती सामाजिक बदलाचे देवदूत म्हणून उभ्या असतात. सर्वांच्या भल्यासाठी समाज परिवर्तनासाठी समर्पित असतात. अटल समर्पण, परिवर्तनवादी नेतृत्व आणि उपेक्षितांचे वकिल या वैशिष्ट्यांचा सुरेख संगम ज्यांच्या व्यक्तिमत्त्वात उमटला ते नाव म्हणजे कर्मयोगी आबासाहेब काकडे. २५ जून १९१९ रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील मंगरूळ खुर्द या गावी आबासाहेबांचा जन्म झाला. वारकरी पंथाचे अनुसरण करणाऱ्या व पंचक्रोशीत नावलौकिक असणाऱ्या शेतकरी कुटुंबातील लक्ष्मीबाई आणि कान्होजी महादजी काकडे यांचे ते सुपुत्र. ज्ञानाच्या तृष्णेने त्यांच्या प्रवासाला चालना दिली आणि शिक्षणाच्या ओढीने आबासाहेब मंगरूळ वरून चापडगाव, शेवगाव, अहमदनगर, पुणे व कोल्हापूर येथे शिक्षण घेत १९४६ मध्ये  बी.ए., एल. एल. बी.ची पदवी संपादन करतात. आबासाहेब काकडे हे केवळ विद्वान नव्हते; तर ते एक कृतीशील व्यक्ति होते. ‘कर्मयोगी’ या शब्दाचे ते मूर्त स्वरूप होते. त्यांचे हृदय हे करुणेचे भांडार होते. त्यांचे जीवन म्हणजे जनसेवेचा दाखला होता. आणि म्हणूनच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते दीन आणि निराधारांचे वकील म्हणून उभे राहिले. वकिली हा त्यांचा केवळ एक व्यवसायाचा भाग नव्हता; तर शोषितांचे दु:ख दूर करणे हे त्यांचे एक मिशन होते. आबासाहेबांना सामाजिक जबाबदारीची उपजत जाणीव होती. त्यांनी आयुष्यभरासाठी शेतकरी व कामगार हिताची डावी विचारधारा तर स्वीकारलीच परंतु चालून आलेली विविध राजकीय प्रलोभने झुगारून ते शेवटपर्यंत ‘लाल निशाण पक्षा’शी एकनिष्ठ राहिले. अहिल्यानगर  जिल्ह्यातील उपेक्षित, वंचित व अन्यायाने पिडीत शेतकऱ्यांचे ते आधारस्तंभ बनले होते. त्यांनी कुळ कायद्यानुसार गरजूंना जमिनी मिळवून दिल्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या हक्कांसाठी निषेध, मोर्चे, सत्याग्रह आणि आंदोलने करून त्यांना न्याय मिळवून दिला. १९४९ साली सरकारच्या दडपशाहीच्या धोरणामुळे त्यांना अटकही झाली. १९५२ च्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील सक्रिय सहभाग, १९५२ साली दुष्काळी मजुरांना संघटित करून न्याय्य हक्कासाठी केलेला मोर्चा, जायकवाडी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आंदोलने, ताजनापूर लिफ्ट योजना, मुळेचे पाणी लाडजळगावपर्यंत गेलेच पाहिजे, कोपरे धरण झालेच पाहिजे या पाणीप्रश्नावर समर्पित भावनेने त्यांनी केलेली तीव्र आंदोलने ही जनतेच्या मनावर अमिट छाप सोडून गेली. आबासाहेबांनी आपल्या राजकीय जीवनात १९५२ ते १९६२ या काळात जिल्हा लोकल बोर्डाचे बोधेगाव गटाचे सदस्य व १९५९ ते १९६१ या काळात जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष म्हणून काम केले. १९५२ सालची नगर उत्तरेतून पहिली लोकसभेची व शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून १९६७ ची विधानसभेची निवडणूक लढवली मात्र त्यांना क्रमांक २ ची मते मिळवून ते अल्पशा मतांनी ते पराभूत झाले. आबासाहेबांची शिक्षणाची आवड ही त्यांच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरणाशी निगडीत होती. त्यांचा असा विश्वास होता की शिक्षण हा खऱ्या सक्षमीकरणाचा पाया आहे. दारिद्र्य आणि अज्ञानाच्या बेड्या तोडून उज्वल भविष्याचा मार्ग दाखविण्याची ताकद शिक्षणात आहे हे त्यांना समजले होते. म्हणूनच त्यांनी ‘दि फ्रेंड्स ऑफ दि डिप्रेस्ड लीग, शेवगाव’ व ‘नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळ, शेवगाव’ या संस्थांची स्थापना केली.  तसेच ‘राष्ट्रीय शिक्षण मंडळ, अहमदनगर’ या संस्थेच्या कार्यात सक्रीय योगदान दिले. आबासाहेबांच्या शैक्षणिक कार्याचा वारसा त्यांच्या अदम्य भावनेचा आणि चिरस्थायी प्रभावाचा पुरावा आहे. वंचितांना शिक्षण देण्याचे त्यांचे समर्पण आणि ज्ञानाच्या परिवर्तनीय शक्तीवर त्यांचा असलेला विश्वास हा लोकजीवन आणि समुदायांना आकार देत आहे. त्यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्था प्रगतीचे आधारस्तंभ म्हणून उभ्या राहिल्या. त्या केवळ शैक्षणिक उत्कृष्टताच नव्हे तर सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरणही देत आहेत. मराठी साहित्याने आबासाहेब काकडे यांच्या वैभवशाली जीवनाचे दर्शन घडवले आहे. पुंडलिक गवंडी यांचे ‘लालसूर्य’, ॲड. डॉ. शिवाजीराव काकडे यांचे ‘आबासाहेब आणि मी’ , अनंत विठ्ठल कुलकर्णी लिखित ‘न्याय हा परमेश्वराचा’ आणि क्षिप्रा शहाणे लिखित ‘कर्मयोगी आबासाहेब काकडे’ या ग्रंथातून आबासाहेबांचा विलक्षण प्रवास शब्दबद्ध केला आहे. या पुस्तकांचे प्रत्येक पान त्यांच्या अतूट समर्पणाचा दाखला देत आहे. कर्मयोगी आबासाहेब काकडे हे केवळ नाव नव्हते; ते अतूट समर्पणाचे प्रतीक होते. परिवर्तनवादी नेतृत्वाचे उदाहरण होते. त्यांचा वारसा कालातीत असून येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरला आहे. माणसाची महानता पदव्या किंवा पदके यांनी मोजली जात नाही तर इतरांच्या जीवनावर पडलेल्या सकारात्मक प्रभावातून ती ठरत असते. दि. ९ ऑक्टोबर १९७८ रोजी अनंतात विलीन झालेल्या कर्मयोगी आबासाहेबांचे कार्य हे अतुलनीय तर होतेच परंतु त्यांचा आत्मा परिवर्तन आणि प्रगती प्रज्वलित करणारी चिरंतन ज्योत होती.

He was active in

Abasaheb’s life inspired numerous books

Lalsurya

by Pundalik Gawandi
Download Book

Abasaheb Aani Mi

by Adv. Dr. Shivajirao Kakade
Download Book

Nyay Ha Parmeshwaracha

by Anant Vitthal Kulkarni
Download Book

Karmayogi Abasaheb Kakade

by Kshipra Shahane
Download Book