सर्जनशीलता, चिकित्सक विचार, सौंदर्यदृष्टी, सामाजिक बांधिलकी, स्वयंरोजगार कौशल्य, पर्यावरण जागरूकता, सांस्कृतिक मूल्ये आणि क्रीडाभावना या गुणांचा शैक्षणिक प्रक्रियेच्या माध्यमातून प्रसार करून जबाबदार नागरिक घडविणे तसेच सशक्त व प्रगतशील भारत बनवणे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शैक्षणिक प्रक्रियेत सर्जनशीलता, विश्लेषणात्मक विचार, सौंदर्याची जाण, सामाजिक जाणीव, उद्योजकतेचे कौशल्य, पर्यावरण संवेदनशीलता, सांस्कृतिक वारशाची जपणूक व शारीरिक स्वास्थ्य यांचा समावेश करून आदर्श नागरिक घडविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
संस्कारै वर्धते राष्ट्रम् | — "Values Enrich the Nation"
ज्ञान आणि सेवेतून परिवर्तन
आमची संस्था पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सशक्त व्यवस्था उभी करत आहे. समाजातील सर्व घटकांपर्यंत शिक्षणाची समान संधी पोहोचावी, प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता फुलावी आणि कोणताही विद्यार्थी मागे राहू नये, हा आमचा मूलभूत उद्देश आहे. आधुनिक सुविधा, कौशल्याधारित उपक्रम आणि मूल्याधिष्ठित मार्गदर्शनाच्या माध्यमातून आम्ही सर्वांसाठी उभे करीत आहोत एक समावेशक, सक्षम आणि प्रगत शिक्षणविश्व, जे प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देईल.
आमची संस्था कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, रोबोटिक सायन्स, कोडिंग, आयबीटी अभ्यासक्रम यासारखे आधुनिक तांत्रिक शिक्षण, संगणक विज्ञान, हस्तकला, औषध निर्माण शास्त्र, शेती आणि विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये कौशल्याधारित शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना रोजगारक्षम आणि स्वावलंबी बनवते. उद्योगविश्व–विद्यापीठ समन्वयावर विशेष भर देत आम्ही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव, आधुनिक तांत्रिक ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्यांचा मजबूत पाया उपलब्ध करून देतो. भविष्यातील करिअर संधींसाठी त्यांना तयार करणारे हे शिक्षण त्यांच्या आत्मविश्वासाला नवी उंची देऊन यशस्वी भविष्याचे दरवाजे उघडे करत आहे.
आमची संस्था शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना भक्कम आधार देण्याचे कार्य सतत करीत आहे. गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, फी, शिष्यवृत्ती तसेच प्रेरणादायी पुरस्कार प्रदान करून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला नवी उभारी देते. आर्थिक अडचण ही शिक्षणाच्या प्रगतीत अडथळा ठरू नये, यासाठी संस्था सातत्याने मदतीचा हात पुढे करते. आमचे हे उपक्रम विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देतात, त्यांची उमेद वाढवतात आणि उज्ज्वल भविष्याकडे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
गेल्या ९२ वर्षांपासून आमची संस्था ग्रामीण व शहरी भागातील गोरगरीब, वंचित, शेतकरी, शेतमजूर आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहे चालवत आहे. येथे विद्यार्थ्यांना सकस भोजन, निवास आणि घरच्या मायेची उब मिळते—हीच आमच्या वसतिगृहांची खरी ओळख. शासनाकडून अनुदान नसलेल्या काळात आमच्या कार्यकर्त्यांनी खळ्यांवर, घराघरांत जाऊन धान्य गोळा करून ही वसतिगृहे अखंडपणे चालवली. लोकांच्या हातातील दान आणि मनातील माया—याच बळावर हा उपक्रम सुरू राहिला. 'मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा' मानणारे श्री संत गाडगे महाराज यांच्या नावाने चालवली जाणारी ही वसतिगृहे आजही तितक्याच समर्पणाने, तितक्याच उर्जेने चालवली जात आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्य देत आहेत.
आमची संस्था निरोगी, आत्मविश्वासपूर्ण आणि सक्षम विद्यार्थी घडवण्यास कटिबद्ध आहे. विविध क्रीडा स्पर्धा, नियमित फिटनेस प्रशिक्षण, कराटे सराव तसेच मुलींसाठी विशेष रित्या आयोजित स्वसंरक्षण वर्ग यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक ताकद, शिस्त आणि आत्मविश्वास विकसित केला जातो. या उपक्रमांमुळे टीमवर्कची भावना बळकट होते, स्वतःचे रक्षण करण्याची क्षमता वाढते आणि जीवनातील आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती निर्माण होते.
आमची संस्था ग्रामीण भागातील तरुणांना स्वावलंबी आणि कुशल बनवण्याचे ध्येय बाळगून विविध कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवते. क्रॉकरी बनवणे, शिवणकला, स्वयंपाक कला, बँकिंग, आयटी अशा क्षेत्रांमध्ये दिले जाणारे प्रशिक्षण तरुणांच्या हाताला व्यवसाय देते आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करते. या उपक्रमांमुळे युवकांच्या आत्मविश्वासात वाढ होते, त्यांना उद्योगशीलतेचा मार्ग खुला होतो व आपल्या पायावर उभे राहण्याची क्षमता विकसित होते.
ग्रामीण भागातील सर्वांगीण समृद्धीसाठी संस्था कृषी प्रशिक्षण, प्रक्रिया उद्योगांची उभारणी, जलसंधारण प्रकल्प, सेंद्रिय शेती मार्गदर्शन आणि कृषी संशोधन अशा उपक्रमांद्वारे कार्य करीतआहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, शेतीतील नवकल्पना आणि शाश्वत विकासाची दिशा देत संस्था ग्रामीण समाजाच्या आर्थिक उन्नतीचे मजबूत आधारस्तंभ बनली आहे.
कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहातील 'महिला शक्ती संघाच्यावतीने ग्रामीण आणि वंचित घटकातील महिलांना स्वावलंबनाकडे नेण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. स्वयंरोजगाराच्या संधी, अन्नपूर्णा मेळावे, हस्तकला प्रदर्शन, लघुउद्योग प्रशिक्षण, आर्थिक मदत, ब्युटी पार्लरचे कोर्स अशा सर्वसमावेशक उपक्रमांद्वारे महिलांना नवनवीन संधी उपलब्ध करून देत नवा आत्मविश्वास दिला जातो. कौशल्य विकास कार्यशाळा आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षणाद्वारे महिला शक्ती संघाच्या वतीने अनेक महिलांच्या जीवनात परिवर्तन घडवले आहे. संस्था “शिक्षण, स्वाभिमान आणि स्वावलंबन” या तत्त्वांवर कार्य करत महिलांच्या प्रगतीची साथीदार ठरली आहे.
आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह सामाजिक बांधिलकीचा दीपस्तंभ म्हणून सतत समाजाच्या पाठीशी उभा आहे. पूर, आग, वीज पडणे अशा आपत्तीच्या काळात तातडीने मदत पोहोचवून अनेक कुटुंबांना आधार दिला आहे. दिव्यांग, विधवा, निराधार, अनाथ, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी आवश्यक साहित्य, निवारा, प्रशिक्षण व पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून त्यांना स्वाभिमानाने जगण्याचे बळ दिले. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी तर संस्थेने ऐतिहासिक ताजनापूर लिफ्ट आंदोलनासह पाणी, गॅस, पिकांना योग्य भाव, व नैसर्गिक आपत्तीनंतर नुकसानभरपाई यांसाठी लढा देऊन शेतकऱ्यांना हक्क मिळवून दिले. समाजासाठी केलेले हे कार्य संस्थेची करुणा, जबाबदारी आणि न्यायासाठीची अखंड निष्ठा अधोरेखित करते.
संस्था शिक्षण, आरोग्य, कृषी, क्रीडा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी प्रतिष्ठित संस्थांशी सातत्याने संशोधन व सहयोग घडवते. विशेषतः फार्मसी कॉलेज आणि संगणक विभाग यांचे वतीने विविध नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार (MoU) करून विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण केल्या जातात. पुणे, छत्रपती संभाजीनगर आदी शहरांतील आयटी आणि फार्मसी क्षेत्रातील तज्ञांना निमंत्रित करून करिअर मार्गदर्शन वर्ग, कौशल्यवर्धन सत्रे व प्लेसमेंट कार्यशाळा आयोजित केल्या जातात. तसेच प्लेसमेंट ड्राईव्हद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नोकरीच्या संधी मिळवून देण्यात येतात. संशोधन, उद्योग-सहकार्य आणि प्लेसमेंट उपक्रमांचे हे प्रभावी संयोजन विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य आणि करिअरमध्ये नवी उंची गाठण्यासाठी सक्षम करते.